डोकं ठिकाणावर आहे का? पंचनामा वाचाल तर वाचाल

पेपर का फुटला?

Written by mpnahar

पेपर का फुटला बरं?

सध्या पेपरफुटीचं प्रकरण बरंच गाजतंय!
बिचारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. कोणी त्यांना पाठिंबा देतय, कोणी टीका करतय, तर कोणी या आंदोलनाचा फायदा घेत स्वतःची पोळी भाजून घेतय.
पेपर फुटला हे मात्र खरं आहे.
पण पेपर का फुटला हा खरा प्रश्न आहे.
कोणी तरी फुटलेला पेपर विकत घेतय म्हणून तर पेपर फोडण्याचं धाडस केलं जातंय हे देखील तितकंच खरं आहे. यावर का कोणी जास्त बोलत नाहीये?
पेपर फोडणारा आणि तो विकत घेणारा या दोघांची जात एकच आहे हे विसरून चालणार नाही. या दोघांची लायकी एकाच तराजूत तोलायला हवी आहे.
जसं आंदोलन सरकारच्या विरोधात केलं जात आहे, ते नक्कीच समर्थनीय आहे, पण त्याबरोबर, त्या पेक्षा जास्त तीव्र आंदोलन फुटलेला पेपर विकत घेणाऱ्या लोकांच्या घरासमोर केलं तरच अशा लोकांना जरब बसेल. अशा लोकांना घराबाहेर तोंड दाखवायला लाज वाटेल असं करायला हवं आहे.
पेपर विकत घेणाऱ्याना पकडलं, त्यात कोणीतरी डॉक्टर पण आहे अशी एक दोनदा बातमी आली पण बस, तेव्हडंच, पुढे असा चोरीचा माल विकत घेणाऱ्या लोकांचा विषय दाबला जातो. खरंतर अशा लोकांचे नाव त्यांच्या फोटो सहीत जगजाहीर करायला हवं आहे.
विकत घेणारा नक्कीच सगळ्यात जास्त दोषी आहे. हा गुन्हा म्हणजे एक प्रकारे शिक्षण व्यवस्थेवर केलेला बलात्कार आहे, आणि हेच कलम अशा लोकांना लावायला हवं आहे. देशाच्या पायाला खिळखिळा करणारा, देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगणारा हा गुन्हा देशद्रोहा इतकंच गंभीर आहे हे जो पर्यन्त आपण सगळे समजून घेत नाही तो पर्यन्त असे पेपर फुटत राहतील आणि ते विकत घेण्याची मानसिकता असणारे विकत घेत राहतील.  
अहो, जर फुटलेला पेपर कोणी विकतच घेतला नाही तर फोडणारे कशाला पेपर फोडतील?
अर्थात पेपर फोडणारे नक्कीच दोषी आहेत आणि त्यांना क्षमा व्हायला नकोच. पण पेपर विकत घेतला आणि हे बिंग फुटलं तर काय होतं हे जगजाहीर पणे सगळ्याना समजायला हवं तेव्हाच या विकृत मनोवृत्तीला आळा बसेल.
– माझ्या नजरेतून, आषाढ शुक्ल एकादशी, दिनांक २५ जुलै २०२६. पुणे.